अयशस्वी मंगळ मोहिमांची मालिका

व्हायकिंग यानाचे यश हे अभूतपूर्व होते. व्हायकिंग लॅंडर ने केलेल्या प्रयोगात  मंगळावर सजीवांच्या अस्तित्वा बद्दल जरी काही ठोस असे निष्कर्ष जरी मिळाले नसले तरी प्रयोग यशस्वी रित्या करण्यात आले हे विशेष मह्त्वाचे. पण या नंतर परत एकदा अयशस्वी मोहिमांच्या मालिकांना सुरवात झाली.

सन १९८८ च्या लॉंच विंडोत रशियाने दोन मोहिमा पाठवल्या – फोबोस -१ आणि फोबोस -२. या मोहिमांना एक प्रकारे आंतरराष्ट्रीय मोहिमा म्हणता येईल. जरी या मोहिमा रशियाच्या असल्या तरी यात अमेरिके सकट फ्रांस, (पश्चिम) जर्मनी, स्विडन, ऑस्ट्रिया अशा एकूण १४ देशांचा वेगवेगळ्या प्रकारे सहभाग होता.  फोबोस -१ चे उड्डाण ७ जुलै १९८८ रोजी झाले तर फोबोस-२ चे त्या नंतर ५ दिवसांनी म्हणजे १२ जुलै रोजी.  फोबोस हे मंगळाच्या एका उपग्रहाच नाव आहे.

फोबोस -१ चा प्रवास २ सप्टेंबर पर्यंत सुरळीत होता. पण त्या नंतर या यानाचा पृथ्वीशी संपर्क तुटला. त्याला कारणीभूत होत एका अक्षराचा फरक.  ऑगस्ट ३० रोजी यानाच्या कंप्युटर मध्ये एक नवीन प्रोग्रॅम अपलोड करण्यात आला होता. या यानाचे जेव्हा पृथ्वीवर परिक्षण करण्यात येत होत तेव्हा यातील उंची आणि दिशा निश्चित करण्याचा जो प्रोग्राम असतो तो बंद केलेला असतो. आणि यानाचे संचालन एका वेगळ्या कंप्युटर द्वारे करतात.  साधारण उड्डाणा पूर्वी  या  कंप्युटर मधील प्रोग्राम डीलीट करतात. पण त्याने ते शक्य झाल नाही कारण वेळ कमी होता आणि शिवाय या कंप्युटरचा वापर आता होणार नव्हता त्या मुळे हा प्रोग्राम डिलीट न करताच याना पाठवण्यात आल. पण जेव्हा ऑगस्ट ३० रोजी नवीन प्रोग्रॅम लोड केला तेव्हा त्या प्रोग्रॅम मध्ये एक अक्षर चुकल होतं. जेणे करून यानाच्या दुसऱ्या यंत्रणेनी पृथ्वीवर वापरातील कंप्युटर सुरू केला. अर्थात त्यात दिशा आणि उंची निश्चित करणारा प्रोग्रॅम नव्हता. त्या मुळे यानाला आपल्या प्रवासाची मार्गाची अचुक आखणी करता आली नाही  आणि यान भरकटल.

फोबोस -२ जानेवारी २९, १९८९ रोजी मंगळजवळ पोचले. आपल्या या प्रवासात त्याने सू्र्य, ग्रहांच्या मध्यल्या माध्यम, मंगळ आणि त्याचा उपग्रह फोबोस यांच्या बद्दल माहीती एकत्र केली. फोबोस-२ यानातून लॅंडर्स फोबस वर उतरवण्यात येणार होती पण त्या पूर्वीच या उप्रग्रहाचा पृथ्वी संपर्क तुटला.  नंतर संपर्क तुटण्याचे कारण कंप्युटर मधील बिघाड हे लक्षात आलं.   पण त्या पूर्वी यानाने फोबोस उपग्रहाची एकूण ३८ चित्र आपल्याला पाठवली यात ४० मीटर पर्यंतचा भाग ओळखू येत होता.

या नंतर २५ सप्टेंबर १९९२ पाठवण्यात आलेली मार्स ऑब्सरव्हर मोहीम पण अयशस्वी ठरली.  ही मोहीम मंगळाच्या पृष्ठभागाचा, वातावरणाचा, तिथल्या हवामानाचा आणि मंगळाच्या चुंबकीय क्षेत्राचा वेध घेण्या करता होती. पण मंगळाच्या कक्षेत पोचण्याच्या तीन दिवस आधीच यानाचा पृथ्वीशी संपर्क तुटला आणि तो जोडण्यात यश आलं नाही.

रशियाने मग १९९६  च्या लॉंच विंडोत मार्स ९६ हे अभियान पाठवले होते.  हा एक फार मोठा महत्वाकांशी प्रकल्प होता. या प्रकल्पात पण अनके देशांचा सहभाग होता. हे यान पण फोबोसच्या धरतीवर होते पण फोबस-१ आणि -२ मधील त्रुट्या यात दूर करण्यात आल्या होत्या.  पण या यानाला घेऊन जाणारे रॅकेट पृथ्वीच्या वातावरणावर पृथ्वीच्या भूपृष्ठावर सुमारे २०० उंची वर क्षती ग्रस्त झाले. त्याचे तुकडे पॅसिफिक महासागरात, चिली आणि बोलिव्हिया पडले.

नोझोमी ही जापानची मोहीम होती. नोझोमी चा अर्थ इच्छा किंवा आशा असा होतो. मंगळाच्या वातावरणाच्या वरचा भाग, या वातावरणावर सौरवायूचा कसा परिणाम, मगंळाच्या आयोनर्फियर चे घटक, तिथले चुंबकीय क्षेत्र आदिंचा अभ्यास करणे ही या मोहिमेची काही उद्दिष्ठे होती. हे यान ४ जुलै १९९८ मध्ये पाठवण्यात आल होत.  या यानाच्या  विद्युत पुरवठ्यात काही खराबी आली आणि अनेक प्रयत्नांच्या अंती जेव्हा यश आले नाही तेव्हा ही मोहीम बंद करण्यात आली.

मंगळाच्या वातावरणाचा अभ्यास करण्यास पाठवण्यात आलेल्या मार्स क्लायमेट ऑरबायटरच्या  अपयशाचे कारण दोन वेगवेगळे एकक – नासा हे मेट्रिक (किलोग्रॅम, मीटर वगैरे)  एकक वापरते तर यानाला पाठवण्यात आलेले संदेशातील एकक हे इंपिरियल (पाउंड, फुट वगैरे) एकक होते. त्या मुळे हे यान चुकिच्या पद्धतीने मंगळाच्या वातावरणात शिरले आणि त्याचे तुकडे तुकडे झाले. या यानाने ११ डिसेंबर १९९८ रोजी उड्डाण केले होते आणि २३ सप्टेंबर १९९९ रोजी याचा पृथ्वीशी संपर्क तुटला.

जानेवारी ३, १९९९ रोजी पाठवण्यात आलेले मार्स पोलार लॅंडरचे ३ डिसेंबर ९९ रोजी मंगळावर उतरताना पृथ्वीशी संपर्क तुटला आणि ही मोहीम पण अयशस्वी ठरली.  ३ जानेवारी १९९९ रोजी पाठवण्यात आलेल्या डीप स्पेस -२ ची पण हीच गत झाली होती. हे यान ३ मार्च २००० रोजी मंगळावर उतरल खर पण पृथ्वीशी याचा संपर्क तुटला आणि ही मोहीम पण अयशस्वी घोषीत करण्यात आली.

या सर्व अयशस्वी मोहिमांच्या मालिकांची यादी आज देण्या मगची कारणे अशी की शास्त्रज्ञ अपयशांमुळे निराश झाले नाहीत – त्यांचे प्रयत्न चालूच आहेत.  आणि दुसरी बाब म्हणजे किती शुल्लक वाटणारी गोष्ट अपयशास करणीभूत होऊ शकते आणि जेव्हा मोहीम यशस्वी होते आणि मोठ मोठ्या शास्त्रज्ञांच्या डोळ्यात आपण आनंदाश्रू बघतो तेव्हा त्या वेळी त्यांच्या काय भावना असतील याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो.